Tuesday, June 6, 2023

एसटीनेच सुरू केली खासगी बसने प्रवासी वाहतूक

औरंगाबाद – कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप संघटनेशिवाय सुरु झालेला आहे. या संपात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. जिल्हाभरातील एकाही आगारातून बस निघाल्या नाहीत, मात्र शुक्रवारी प्रशासनाने औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून पुणेसाठी सायंकाळी साडेचार वाजता आणि साडेपाच वाजता एक या प्रमाणे दोन खासगी अरहम ट्रॅव्हल्समार्फत चालवल्या जाणाऱ्या शिवशाही बस पुण्याकडे रवाना करण्यात आल्या. एका बसमध्ये २५ तर दुसऱ्या बसमध्ये ३५ असे साठ प्रवासी पुण्यासाठी गेल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

एरवी शिवशाहीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकावरच तिकीट दिल्या जाते. मात्र वाहक संपात सहभागी असले तरी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहकांची भूमिका बजावत प्रवाशांना तिकिटे दिली. औरंगाबाद विभागात ११ खासगी शिवशाही आहेत, त्यामुळे टप्प्याने पुणे आणि नाशिकसाठी या बसगाड्या वाढवण्यात येत आहेत. येत्या काळात आणखी काही बस सुरु करता येतात का यावर विचार मंथन करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगीतले.