औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी काही दिवस प्रवाशांचे हाल होणार असल्याचे मात्र स्पष्ट दिसत आहे. दरम्यान संपाच्या काळात मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून, लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक 10 कोटी 50 लाखांचा महसूल बुडाल्याचाचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
परभणी जिल्ह्यात चार आगारातील पंचवीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे परभणी जिल्ह्यात एकूण 1400 कर्मचारी कार्यरत आहे यातील प्रशासकीय आणि यांत्रिक स्तरावरील जवळपास 40 ते 45 कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याची माहिती परभणीच्या विभागीय नियंत्रकांनी दिली आहे आतापर्यंत परभणी विभागाचा सुमारे तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारात सुमारे 900 कर्मचारी संपावर गेले आहेत. आत्तापर्यंत तिने आगार मिळून सुमारे तीन कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान हिंगोली जिल्ह्यातून एसटीला झाले आहे.
जालना जिल्ह्यात एसटी चे एकूण चार आगार असून त्यात 220 बसेस कार्यरत आहेत जिल्ह्यातील 1340 कर्मचारी संपावर गेले आहेत. जालना जिल्ह्यात एसटीचे दिवसाला 25 ते 27 लाखाचे उत्पन्न बुडत आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी संपावर गेले आहेत आजवर जिल्ह्यात 56 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. नांदेड जिल्ह्यातील नही दोन हजार 953 कर्मचारी संपावर आहेत तर 256 कर्मचारी कामावर आहेत आज पर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 62 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दुसरीकडे लातूर जिल्ह्यात दोन हजार आठशे 46 कर्मचाऱ्यांपैकी 2262 कर्मचारी संपावर आहेत लातूर जिल्ह्यातून एसटीला दिवसाला सरासरी 30 ते 40 लाखांचे उत्पन्न मिळते परंतु संपामुळे या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागत आहे.
मराठवाड्यातील संपाची स्थिती –
औरंगाबाद जिल्हा – 61 कर्मचाऱ्यांचे निलंबन तर सुमारे 7 कोटी रुपयांचे नुकसान
जलना जिल्हा – 29 कर्मचाऱ्यांचे निलंबन, 3 कोटींचे नुकसान
परभणी जिल्हा – 25 कर्मचारी निलंबित, 2 कोटी 75 लाखांचे नुकसान
हिंगोली जिल्हा – 15 कर्मचारी निलंबित, 3 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान
नांदेड जिल्हा – 62 कर्मचारी निलंबित, सुमारे 8 कोटी रुपयांचे नुकसान
बीड जिल्हा – 87 कर्मचारी निलंबित, 5 कोटी 75 लाखांचे नुकसान
लातूर जिल्हा – 60 कर्मचारी निलंबित, सुमारे 10 कोटी 50 लाखांचे नुकसान
उस्मानाबाद जिल्हा – 56 कर्मचारी निलंबित, 4 कोटी 70 लाख रुपयांचे नुकसान