सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पेटा संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून बैलगाडा हौशींकडून या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्या म्हणून धडपड केली जात आहे. दरम्यान, सातारा-जावळी मधील बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी “बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले सांगितले.
यावेळी आमदार भोसले म्हणाले की, पूर्वीच्या काळी राज्यात बैलगाडा शर्यती घेतल्या जात. त्यावर पेटा संस्थेच्या वतीने बंदी घालण्यात आली. या संस्थेच्या याचिकेनंतर काही निर्णय झाले आहेत. त्यामुळे या शर्यती थांबल्या आहेत. खरेतर बैलगाडी शर्यती या ग्रामीण भागाशी जोडलेला प्रकार आहे. बैलांना फार जपण्याचे काम शेतकरी करीत असताे. बैलगाडा शर्यत ही मनोरंजनाची गोष्ट आहे. यात्रांमध्ये जसा तमाशा होतो तसेच या शर्यती होतात. हजारो लोक बैलगाडी शर्यती पाहायला यायचे. या ठिकाणी बक्षीसे लावलेली जात मात्र, आता बैलगाडा शर्यत बंद असल्याने शर्यती भरवणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
संघटनेच्यावतीने शर्यती सुरु करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामुळे याचा विचार करीत लवकरच सातारा जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या बैलगाडा शर्यती सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रयत्न केला जाईल. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच त्यांच्याशी चर्चा करून लवकर बैलगाडा शर्यत सुरु कराव्यात, अशी मागणी करणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.