T20 वर्ल्ड कपपासून लागू होणार नवीन नियम; गोलंदाजांची अडचण वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने क्रिकेट मध्ये एक नवा नियम लागू केला आहे. स्टॉप क्लॉक नियम (Stop Clock Rule) असे या नव्या नियमाचे नाव असून या नियमामुळे गोलंदाजांची अडचण वाढणार आहे. याचे कारण म्हणजे या नियमानुसार, एक षटक संपल्यानंतर ६० सेकंद होण्याच्या आतमध्ये दुसरे षटक सुरू होणे अनिवार्य असणार आहे. असं न झाल्यास सदर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दंड बसू शकतो. हा नियम सुरुवातीला डिसेंबर 2023 मध्ये चाचणीच्या आधारावर लागू करण्यात आला होता. परंतु आता सर्वच आंतरराष्ट्रीय T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी अमलात आणला जाईल.

सामना सुरु असताना वेळेची बचत करणे हेच या नव्या नियमाचे उद्दिष्ट आहे. स्टॉप क्लॉक नियमानुसार, एक षटक संपल्यानंतर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुढील षटक ६० सेकंदात म्हणजेच एक मिनिटात सुरू करावे लागते. षटक संपताच स्टॉप वॉच सुरू होईल आणि त्यानंतर 60 सेकंदांच्या आत संघाला पुढचे षटक सुरू करावे लागेल. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हा नियम पाळला नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जर कोणत्या संघाने ६० सेकंदाच्या आत दुसरं षटक टाकलं नाही तर पंच त्या संघाला २ वेळा वॉर्निंग देतील, मात्र तरीही नियमाचे पालन न केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना पाच धावांचा दंड होऊ शकतो.

या नव्या नियमामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेळेकडे लक्ष्य देत सावधिगिरी बाळगावी लागणार आहे. हा नियम T20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी लागू केला जाईल. आयसीसीकडून काही घटनांसाठी मात्र या नवीन नियमापासून सूट देण्यात आली आहे. नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यास, ड्रिंकसाठी ब्रेक घेतल्यास, खेळाडूला दुखापत झाल्यास अशा घटनांमध्ये वेळेचे बंधन ग्राह्य धरले जाणार नाही.