औरंगाबाद : कोरोना परिस्थितीतही जिल्हयातील नागरिकांची होणारी पिळवणूक त्वरित थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील देसाई यांना देण्यात आले आहे.
त्यात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना महामारीसारख्या परिस्थिती मध्ये शहरात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी शासकीय यंत्रणा नागरिकांना सेवा देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे खाजगी दवाखान्यात लूट सुरू आहे. शासकीय रुग्णालयात कधी खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते तर कधी औषधी उपलब्ध नाही बाहेरून आणा, असे सांगितले जात आहे. नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत आहे.
विविध माध्यमांनी देखील याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. असे असताना प्रशासकीय आरोग्य यंत्रणा उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी कमी पडते आहे. अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी टाळाटाळ करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, पाणीपुरवठा विसकळीत झाला आहे, तो सुरळीत करावा, यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. सक्तीचे वीजबिल भरण्यासाठी सांगितले जात आहे. ते देखील थांबवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे , राजेश मेहता, समीर राजूरकर, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे आदी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा