सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली शहर परिसरातील शामरावनगर येथील साई कॉलनीतील भंगार गोदामाला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र स्वरुप धारण केल्याने यामध्ये प्लास्टिक, वायरींसह विविध भंगार साहित्य जळून खाक झाले. गोदामापासून जवळच असलेल्या बिरदेव रघुनाथ पालखे यांच्या घरालाही आगीचा फटका बसला. त्यात त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दोन्ही दुर्घटनेत सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन विभागाने तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
साई कॉलनीत गादी कारखान्याजवळ रामा मधुकर घाडगे यांचे प्लास्टिक, वायरींसह विविध वस्तूंचे भंगार दुकान आहे. त्याच परिसरात बिरदेव रघुनाथ पालखे हे राहतात. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक भंगार गोदामातील साहित्याने पेट घेतला. आग नेमकी कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. हा प्रकार घरात झोपलेल्या बिरदेव पालखे यांच्या निदर्शनास आला. तोपर्यत पालखे यांच्या घराला देखील आगीने वेढले. त्यांनी आरडाओरड करीत नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न केला.
तातडीने अग्निशमन विभागाला घटनेची कल्पना दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी सर्जेराव देसाई, सहाय्यक अधिकारी विजय पवार, चिंतामणी कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर चार तासानंतर आग आटोक्यात आली.