Friday, June 9, 2023

Success Story : कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाधा

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी हार न मानता पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. यामधून कमीत कमी एकरी 30 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच बैलगाडीमधून 10 रुपये किलो दराने टरबूज विक्री केली आहे. यातून त्यांना 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामधून जर त्यांनी लागवड खर्च वगळला तर त्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील राजू चौधरी यांनी 2 महिन्यांपूर्वी दोन एकरात कलिंगडाची लागवड केली होती. त्यानंतर कलिंगड विक्रीला आले असता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागला. त्यामुळे विक्री कुठे आणि कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा ठाकला होता. यानंतर त्यांनी यातून मार्ग काढत त्यांनी बैलगाडीमधून कलिंगड विकायला सुरुवात केली. थेट ग्राहक ते शेतकरी या पद्धतीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांना या विक्रीमध्ये 10 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.

राज्यात सध्या कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे राजू चौधरी या शेतकऱ्याने स्वतःच कलिंगडाची विक्री केली. यामुळे त्यांना चांगला नफा मिळाला. यामुळे जर अनेक शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन जर पिकविलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही.