Wednesday, June 7, 2023

ऊसतोड मजूरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा पण…

मुंबई । ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय करावी याकरिता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मजुरांना टप्प्याटप्य्याने प्रवास करायचा आहे. ऊसतोड मजूर ज्या ज्या जिल्ह्यांत आहेत तेथील सदर ऊस कारखान्याचे एमडी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या मजुरांच्या स्वगृही परतण्याची योजना आखायची आहे अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे.

तसेच ज्या मजुरांचे वास्तव्य निवारा केंद्रात, मदत छावणीत १४ दिवसांपेक्षा जास्त झाले आहे. जे कारखाने बंद झालेत अशा सर्व ऊसतोड मजुरांना परत घरी आणण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ऊस हंगाम संपला असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. मात्र आता पावसामुळे हाल होत असल्याने आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करून त्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. नुकताच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

“तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच राहा.” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. “कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखर कारखाना परिसरात झालेल्या वादळाने कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली.” अशीही माहिती धनंजय मुंडेंनी दिली.