राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर आमदार, मंत्र्यांनी शिंदे सरकारशी हातमिळवणी केली. तर थोडेच दिवस उलटून गेल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या वेळी हे सर्व आमदार अजित पवारांसह शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले. त्यानंतर दोन वेळा अजित पवार गटाने शरद पवारांना विनंती करत एनडीएत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येईल अशा चर्चा रंगण्यास सुरूवात झाली.
आता या सर्व चर्चां सुरू असतानाच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकताच दोन्ही गट एकत्र येतील का? असा सवाल सुनील तटकरे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत त्यांनी, “राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येतात का हे पाहण्यासाठी काही कालावधी पुरतं आपण थांबावं. काळाच्या ओघात याची उत्तरे नक्की मिळतील” असे सूचक वक्तव्य केले आहे.
त्याचबरोबर, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार याबाबत इंडिया आघाडीमध्ये नाराजी का आहे याबाबत मला माहिती नाही. शरद पवार अशा अनेक कार्यक्रमाला जात असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन पवार साहेबांच्याकडून नेहमीच होत असतं. इंडिया आघाडीमध्ये या कार्यक्रमाला जाण्यावरून नाराजी असेल तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे” असे ही सुनील तटकरे यांनी म्हणले आहे.
पुढे बोलताना, “महाविकास आघाडीमध्ये अजितदादांनी सरकार चालवण्याचं मोठं योगदान दिलेलं आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक कदाचित मुंबईत होत असेल” असे तटकरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात लवकरच मोठ्या घडामोडी पाहिला मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.