हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केल्यानंतर आता आणखी एक बदल केला आहे. पवारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर राष्ट्रवादीच्या खजिनदारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आल्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंट वरून दिली आहे. सुनील तटकरे हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. तसेच त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकूण कामाचीच ही पोचपावती आहे असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने माननीय खा. सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.@SunilTatkare pic.twitter.com/TUp07BPLAi
— NCP (@NCPspeaks) June 12, 2023
दरम्यान, 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी निवड केली. एकाच वेळी 2 कार्याध्यक्ष राष्ट्रवादीला मिळाले आहेत. या निवडी सोबतच पवारांनी अन्य नियुक्त्या सुद्धा केल्यात. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, मोहम्मद फैजल, नंदा शास्त्री यांचा समावेश करण्यात आला आहे.