राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार; 2 वर्षाच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा देत मोदी आडनावाप्रकरणी दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. गुजरात कोर्टाने याप्रकरणी राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहानी प्रकरणी दोषी ठरवले होते. त्याचबरोबर त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र इथे देखील त्यांच्या या मागणीला फेटाळण्यात आले होते. यानंतर शेवटी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज याच प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात राहूल गांधी यांच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. यावेळी, राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा देण्याचे निकष काय आहेत. त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकते असे न्यायलयाने म्हणले. तसेच “याशिवाय त्यांच्या मतदार संघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता” असेही न्यायालयाने म्हणले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं राहूल गांधीच्या बाजूने निकाल दिला.

मुख्य म्हणजे, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी “नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद” अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, या निकालावर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया देत, सर्वोच्च न्यायालयात तरी न्याय जिवंत आहे न्याय मेलेला नाही असे म्हणले आहे. राहूल गांधींच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीमुळे त्यांना परत खासदारकी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याप्रकरणी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. तसेच त्यांना सरकारकडून मिळालेले राहते घर देखील सोडावे लागले होते.