हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कालपासून शिर्डीत ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबीरास सुरुवात झाली आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 8 वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, स्मार्ट सिटी योजना पहिल्यांदा सुरू झाली, तेव्हा माझ्या सहकारी खासदारांना वाटलं की पिंपरी चिंचवड स्मार्ट होणार म्हणजे सर्व पुणे स्मार्ट होणार. मात्र, आम्ही जेव्हा ही पूर्ण योजना वाचली, तेव्हा लक्षात आले की स्मार्ट सिटी म्हणजे पूर्ण शहर स्मार्ट होत नाही, तर स्मार्ट सिटी म्हणजे केवळ 40 हजार लोकांना एक ब्लॉक स्मार्ट होतो.
वास्तविक, केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात दोन सिटींसाठी खूप पैसे खर्च केल्याचे सांगत आहे. 50 हजार कोटी रुपये हे फक्त स्मार्ट सिटीसाठी आणि 50 हजार कोटी अमृत सिटीसाठी खर्च केले आहेत. त्यामुळे एकूण 1 लाख कोटी त्यांनी या योजनेवर खर्च केले आहेत, याचे ऑडीट कोणीतरी करायला हवे, हे एक लाख कोटी रुपये नक्की गेले कुठे? कारण मला या शहरांमध्ये कोणतेही परिवर्तन दिसले नाही. पुण्यात पाऊस पडला आणि लोकांना पुरामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले. मग हा पैसा गेला कुठे आणि अनेक शहरांमध्ये किती पैसे आले, याची माहिती नाही”, अशी टीकाही सुळे यांनी केली.