कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सुप्रिया सुळेंकडून दखल; केंद्राकडे केली मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारपेठेत कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याच्या मागणीत घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यातबंदी मागे घ्या, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली. यामुळे बाजारभाव कोसळले असून अक्षरशः कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काहीजणांनी तर कांदा उघड्यावर फेकून दिला आहे. तर दुसरीकडे जगभरात कांदाटंचाई आहे. तेथे मागणी असूनही कांदा निर्यातबंदीमुळे तो जागतिक बाजारपेठेत पाठविता येत नाही.

अशा गोष्टींमुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती डोळ्यांदेखत सुरू असताना केंद्रीय कृषी आणि वाणिज्य मंत्रालय काय करत आहे? दोन्ही मंत्र्यांनी ही स्थिती पाहून तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे.

या दोन्ही मंत्रालयांनी या परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घेऊन देशातील जादा कांदा, जागतिक बाजारपेठेत पाठविल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे अशी सरकारची इच्छा असेल तर याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.