हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने असताना ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत असल्याची घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्यात केली आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी हे प्रकार आवरावेत, असा टोलाही त्यांनी शंभूराज देसाईंना लगावला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे सातारा दौर्यावर होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा बाजार सुरू आहे. त्याविरोधात आमची एक महिला भगिनी लढा देत असताना त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, आम्ही पूर्ण ताकतीने त्यांच्या बाजूने उभे आहोत.
खोके सरकार ‘आईस’मध्ये व्यस्त
राज्यात अनेक आव्हाने असताना खोके सरकार आईसमध्ये (इन्कमटॅक्स, ईडी आणि सीबीआय) व्यस्त आहे. दुसरीकडं घरं आणि पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर या देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून तो शरद पवार यांचाच आहे, असे खासदार सुळे यांनी ठणकावले.
गृहमंत्र्यांनी ललित पाटील प्रकरणावर स्पष्ट बोलावे
ललित पाटील प्रकरणावर गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे बोलावे. खरे काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. देवेंद्र फडणवीस दोन मिनीटेच माध्यमांशी बोलले. त्याऐवजी 10-15 मिनीटे बोलले असते तर राज्यालाही खरे काय ते समजले असते. ललित पाटील पळून गेला, त्याची जबाबदारीही गृहमंत्र्यांनी घ्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लगावला.