हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची (Baramati) ओळख आहे आणि याच बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खासदार आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विदर्भातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “पक्षाने संधी दिली तर माझी वर्ध्यातून लोकसभा (Wardha Lok Sabha) निवडणूक लढण्याची इच्छा राहील” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला याच वर्ध्यातून भाजप आपल्या एका दिग्गज नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याची देखील चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे यांना वर्धा मतदारसंघातून उमेदवारी देईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी 2 ऑक्टोंबर रोजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा दौरा केला. यानंतर त्यांनी पवनार व सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील. वर्षातून एकदा सेवाग्राम आश्रमाला भेट देत असते. त्यामुळे नवी ऊर्जा मिळते”
त्याचबरोबर, “राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास सोयाबिनला सात हजार तर बारा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देवू. या ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे. इतरांचे घर फोडण्याची यांची धडपड चालली आहे” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. दरम्यान, सध्याच्या घडीला वर्धा मतदार संघातून भाजपचे रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत. परंतु आगामी काळात भाजप लोकसभेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या इच्छेचा मान ठेवून राष्ट्रवादीने जर त्यांना वर्ध्यातून उभे केले तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळेल.