हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत सुप्रिया सुळे खासदार असताना त्यांच्या विरोधात निवडणूक अजित पवार गट कोणाला उभे करेल याबाबत चर्चा रंगली आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व चर्चा सुरू असताना अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे.
“खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित दादांनीच निवडून आणलं” असे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत रूपाली चाकणकर म्हणाल्या की, “अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. त्यांना विकासाचं राजकारण हवं आहे. दादासोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय. सुप्रिया ताई गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. आता दादासोबत नाहीत म्हणून तुम्हाला 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार आहे”
त्याचबरोबर, “भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही. लोकसभा निवडणुका काहीच दिवसांवर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विजय होईल. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. अजितदादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू” असे देखील रूपाली चाकणकर म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांची टीका
दरम्यान, “मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत बायको आणि आईला बारामतीतच राहू द्या. त्यांना सांगितलं. एप्रिलमध्ये माझी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे मला भेटायचं असेल तर बारामतीला यावं लागेल” असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतरच रूपाली चाकणकर यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.