मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्याकाळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नाही. तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत. “आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant, #sushantsinghrajput, #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत आहोत,” असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं.
“कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”