मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा रविवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याने आत्महत्या केली असे म्हंटले जात आहे. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या तमाम चाहता वर्गावरही शोककळा पसरली आहे. त्याच्या आठवणीत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंह हिनेही तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ती परदेशात असल्याकारणाने ती सुशांतच्या अंत्यविधीसाठी येऊ शकली नव्हती.
‘माझे बेबी, माझा बाबू, माझे बाळ आज शरीररुपाने आपल्यात नाही आहे आणि ते ठीक आहे. मला माहित आहे, तू फार दुःखात होतास, आणि मला हेही माहित आहे की, तू एक योद्धा होतास आणि खूप शूरपणे लढत होतास. सॉरी माझ्या सोन्या, ज्या दुःखातून तुला जावे लागले त्या सर्वांसाठी माफ कर. जर मी काही करू शकले असते तर ती सगळी दुःखे मी घेतली असती आणि माझी सगळी सुखे तुला दिली असती. तुझ्या चमकणाऱ्या डोळ्यांनी जगाला स्वप्न कसे पाहावे ते शिकविले, तुझ्या निरागस स्मितहास्याने हृदयाची खरी पवित्रता दाखवून दिली आहे.’ अशी भावनिक पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.
तसेच त्यांनी, ‘मी नेहमीच तुझ्यावर खूप प्रेम करत राहीन, तू जिथे आहेस तिथे आनंदी राहा, आणि तुला माहित आहे की, सगळे तुझ्यावर प्रेम करत होते, करत आहेत आणि नेहमी कोणत्याही अटीशिवाय प्रेम करत राहतील.’ असेही लिहिले आहे. तिच्या या भावनिक पोस्टमुळे सुशांतचे चाहते भावुक झाले आहेत. कायपोचे या सिनेमातून सुशांतने छोट्या पडद्यावरून बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर आपल्या लक्षणीय अभिनयाने त्याने त्याची प्रत्येक भूमिका अगदी सरस पणे निभावली होती. मोजक्याच सिनेमात काम केले असले तरी त्याची प्रत्येक भूमिका त्याने लाजवाबपणे केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”




