रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – दापोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या नातू खोतवाडी या ठिकाणी एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा अपघात आहे कि घातपात याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व इंदुबाई पाटणे अशी जळून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. या मृत महिलांपैकी सत्यवती पाटणे आणि पार्वती पाटणे या दोघीच घरी राहत होत्या. तर इंदुबाई पाटणे या त्यांच्या नातेवाईक होत्या. त्या समोरच्याच घरात राहत होत्या. या वृद्ध महिलांचे नातेवाईक कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. या तिन्ही महिलांचा एकमेकांना आधार होता. या घटनेत सत्यवती पाटणे या चुलीजवळ, पार्वती पाटणे या दुसऱ्या खोलीत तर इंदुबाई पाटणे या हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या.
गावकऱ्यामुळे उघडकीस आली घटना
पाटणे यांच्या घरासमोरच कुलदेवतेचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये गावातील विनायक पाटणे हे दररोज पूजा करण्यासाठी येत असतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी उन्हात बसायच्या. मात्र नेहमीप्रमाणे विनायक पाटणे कुलदैवताची पूजा करण्यासाठी आले तेव्हा या महिला त्यांना घराबाहेर दिसल्या नाहीत. तसेच त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. विनायक यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी मागच्या दरवाज्याकडे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता. यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले असता या तिन्ही वृद्ध महिला मृतावस्थेत आढळल्या. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
श्वान पथकाद्वारे अधिक तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घराच्या आजूबाजूला कसून तपास केला. या प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. हा अपघात आहे कि घातपात आहे याचा दापोली पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.