हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी सर्वपक्षीयांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 9 दिवसांपासून उपाशी असल्यामुळे जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते त्यावेळी देखील त्यांची प्रकृती प्रमाणापेक्षा जास्त खालावली होती. मात्र सद्यस्थितीत जरांगे पाटील यांची प्रकृती तेव्हा पेक्षा अधिक खालावली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणामध्ये जरांगे पाटील यांना अधिक त्रास झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्येच राहावे लागणार आहे. ज्यामुळे यंदा त्यांची दिवाळी ही रुग्णालयातच साजरी होण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत यावेळी जरांगे पाटील यांना जास्त अशक्तपणा आला आहे. तसेच जेवण न केल्यामुळे त्यांचे वजन घटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या लिव्हर आणि किडनीवर सूज आली आहे. तसेच त्यांचे ब्लड प्रेशर कमी झाले आहे. यामुळे सध्या जरांगे पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गेल्या दोन-चार दिवसांपासून चांगलेच तापले होते. यामध्ये जोपर्यंत मराठा समाजाला सरकार सरसकट आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणा स्थळी येऊन जरांगे पाटलांना दोन महिन्यांची मुदत मागितली. त्यानुसार, जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.