तब्लिगी जमातीतील २०० कोरोनामुक्तांचा प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | तब्लिगी जमातीने १३ ते १६ मार्च या कालावधीत दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे २५०० लोकांचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमातून देशभर पसरलेल्या तब्लिगिंपैकी १०८० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. यामुळे पूर्ण देशभरातूनच या समुदायावर टीकेची झोड उठली होती. या १०८० तब्लिगिंपैकी ८७० पेशंट कोरोनामुक्त झाले आहेत. यातील २०० पेशंटनी बाकी कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज देण्याचा निर्धार केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे. तब्लिगिंना देशविघातक समजणाऱ्या लोकांसाठी हा एक सुखद धक्काच म्हणायला हरकत नाही.

दिल्लीमधील अरविंद केजरीवाल सरकारने कोरोनामुक्त पेशंटकडून प्लाझ्मा थेरपीसाठी मदत करण्याचं आवाहन रविवारी केलं होतं. याला तात्काळ प्रतिसाद या २०० कोरोनामुक्तांकडून मिळाला आहे. दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलियरी सायन्सेसमध्ये हे कोरोनामुक्तांच्या अँटीबॉडीजचं प्लाझ्मा थेरपीसाठी संकलन करण्यात येत असून सोमवारी १२ जणांनी याठिकाणी आपल्या अँटीबॉडीज दिल्या. प्लाझ्मा उपचार करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. दिल्ली सरकारकडून देशाच्या राजधानी क्षेत्रात येणाऱ्या सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दिल्लीतील २० रुग्णांसाठीच आतापर्यंत ही परवानगी मिळाली असून याचा सकारात्मक परिणामही सुरुवातीच्या टप्प्यात दिसून आला आहे.

दिल्लीतील तब्लिगी लोकांनी अँटीबॉडीज द्यायचा निर्णय घेतल्यानंतर आता तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील तब्लिगी मुसलमानांनीही यासाठी पुढाकार घेतला असल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या माध्यमाकडून देण्यात आलं आहे.