औरंगाबाद – अनेक हिंदी चित्रपटात गुंड पोलिसांना ‘वर्दी उतार के आओ तुमको देख लेता’ असे डायलॉग मारतांना आपल्याला दिसतात. यासारखी अशीच काही घटना औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घडली. एसटीच्या वाहकाला धमकावल्यानंतर पोलिसांनी गुंडाला ठाण्यात आणल्यानंतर त्याने तेथे गोंधळ घालने सुरू केले. फौजदार त्याची समजूत घालत असतानाच गुंड फौजदारवरच चिडला आणि थेट त्याने धमकीच दिली. एजाज खान शेरखान मुजावर पठाण वय-46 (रा.प्रसादनगर, सिल्लोड) असे गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी सिल्लोड डेपोचे वाहक शैलेश वैष्णव यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुवारी रात्री सिल्लोड येथून औरंगाबाद मुक्कामी आलेल्या बसमध्ये चढला. त्याने आधी प्रवाशांसोबत अरेरावी केली. तेव्हा वाहक व चालक यांनी त्याला समजावत ही बस आता जाणार नाही असे सांगितले. त्यावर त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली व वाहकाची कॉलर पकडून हुज्जत घातली. तेव्हा एसटीच्या अधिकारी यांनी हस्तक्षेप करीत आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्याला क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेले. तेथेही त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ड्युटी इंचार्जअसलेले उपनिरीक्षक अशोक शिर्के तेथे आले त्यांना या आरोपीने शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.