कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, विवाह समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यांमध्ये 50 लोकांची उपस्थितीची मर्यादा आहे. यावर यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवावे. शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले, यामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसर सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच मॉल्सची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावा. कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये  मालांचा लिलाव दिवसातून वेगवेगळ्या वेळा घेता येईल का याबाबत  विचार करण्यात यावा. वरील आस्थापनांसह रेस्टॉरंट, हॉटेल्स ,खानावळी याठिकाणी दोन्ही लसीकरण पुर्ण झालेल्या कामगारांनाच काम करण्यास मुभा राहिल. तसेच प्रवासासाठी दोन्ही डोस लसीकरण हा नियम वाहन चालक/ क्लीनर्स/ इतर सहयोगी कर्मचारी व मनुष्यबळास पालन करणे बंधनकारक राहील. भाजीमंडई तसेच रस्त्यांवर विक्री करणारे भाजी विक्रेता यांनी 2 डोस पूर्ण केलेले असावेत. जर 2 डोस पूर्ण नसतील तर  त्यांनी  RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील व्यापारी ,हॉटेल/रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, ट्रॅव्हल्स/बस/टॅक्सी, ऑटो असोसिएशनचे पदाधिकारी दूरदृष्य प्रणाली माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.