Wednesday, June 7, 2023

सांगवड पुलाजवळ भीषण अपघात : दोन दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 2 गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील नवारस्ता- मरळी मार्गावर असलेल्या नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यातील शिंदेवाडी, येरफळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

अपघातात नितीन बबन तिकुडवे (वय- 36, रा. शिंदेवाडी, ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (वय- 43), बबन धोंडिराम पडवळ (वय- 70 दोघेही रा. येरफळे, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी, ता. पाटण), संकेत सिताराम शिंदे (रा. तामकणे, ता. पाटण) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ (MH- 50- E- 7229) आणि (MH- 50- T-2510) या दोन दुचाकीची समोरसमोर धडक झाली. नितीन तिकुडवे याने त्याचे ताब्यातील दुचाकीवर पाठीमागे अनिकेत पाटील यास बसवून नवारस्ता ते मरळी बाजूकडे जात असताना समोरून मरळी ते नवारस्ता बाजूकडे जाणारे दुचाकीवर असणारे चालक भरत पाटील, धोंडिराम पडवळ व संकेत शिंदे यांना सांगवड पुलाजवळ जोराची धडक दिली.

दोन्ही दुचाकीची धडक इतकी भीषण होती की, या धडकेमध्ये नितीन तिकुडवे, भरत पाटील व बबन पडवळ हे ठार झाले. तर अनिकेत पाटील व संकेत शिंदे हे गंभीर जखमी झाले. याबाबत पाटण पोलिसात पोलीस हवालदार कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मल्हारपेठचे पोलिस ठाण्याचे अजित पाटील करीत आहेत.