हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मेहेरबानीनेच मिध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले हे काय आता लपून राहिले नाही. हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कडू शमवीत आहेत, त्या सगळयांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाहयां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळयांनी काढला असं म्हणत सामनातून शहांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
छत्रपतीचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे. बेइमान व महाराना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकरेंचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले असा आरोपही सामनातून करण्यात आलाय.
महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही? ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला व बाळासाहेब ठाकरे यांच्या देवघरात पुजला जाणारा धनुष्यबाणही चोरून दिल्लीचे तळवे की आणखी काही चाटणाऱ्यांच्या होती ठेवला तो कोणत्या बहुमताच्या आधारावर? हा प्रकार बेबंदशाहीचा आहे व बेबंदशाहीवाले महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांवर फुले उधळतात हा तर महाराष्ट्र आणि शिवरायांचा अपमान आहे. महाराष्ट्रतील जनता यासाठी भाजपला माफ करणार नाही असं सामनातून म्हंटल.
अमित शहा पुण्यात येऊन सांगतात, “धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते!” हे भंपक विधान ते एक नंबरच्या धोकेबाजांच्या मांडीस मांडी लावून करीत आहेत. मोदींच्या नावाने मते मागितली, मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले, असे दिव्य विचार त्यांनी मांडले. असे बोलणारे स्वताच्या ढोंगबाजीवरच शिक्कामोर्तब करीत आहेत. मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही असे म्हणत सामनातून अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय.