अयोध्येत नवं ‘मोदी रामायण’, देश 500 वर्ष मागे; सामनातून भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे. अयोध्या हे रामाचे राज्य, पण त्या राज्यावर आज भाजपच्या फौजांनी ताबा घेतला व त्याला 2024 च्या निवडणुकांचे रणमैदान केले. यानिमित्ताने भाजपच्या लोकांनी देशभरात वातावरण निर्मिती केली, जणू वाल्मीकीचे, तुलसीचे, कवीराचे, कम्ब रामायण खरे नसून मोदी हेच नव्या रामायणाचे निमति आहेत. अयोध्येच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी देशाला पुन्हा किमान 500 वर्षे मागे नेले, पुराणाच्या वातावरणात नेले असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका (Saamana Editorial Slam BJP) केली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

श्रीराम हे फक्त हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एक नाहीत, ते राष्ट्राच्या अस्मितेचा प्राण आहेत. त्या अस्मितेसाठी अयोध्येच्या रणभूमीवर मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षात अनेक रामभक्तांचे बळी गेले. अनेकांनी तुरुंगवास भोगला. अयोध्येतून वाहणारी शरयू नदी भक्तांच्या रक्ताने लाल झाली तेव्हा कोठे आजचा दिवस सोनेरी किरणे घेऊन उगवला आहे. रामजन्मभूमीची लढाई किमान 500 वर्षांची आहे. या लढाईने अनेक वळणे घेतली. 1528 पासून रामाच्या हक्काच्या निवासाचा वाद सुरू झाला तो 1992 ला संपला. ज्या वादग्रस्त जागेवर श्रीरामांचे गर्भगृह होते, त्यावर मशिदीचे घुमट होते. आक्रमक बाबराच्या नावाने मीर बांकीने ती इमारत उभी केली. अयोध्येत रामजन्मभूमीवर एका मशिदीत श्रीराम 1528 पासून राहिले. हासुद्धा वनवास होता. राम अयोध्येत असूनही निराधार, वनवासी अवस्थेत राहिले. अयोध्येतील त्या जागेवर मुसलमानांनी दावा सांगितला व ‘राम अयोध्येत खरेच जन्मले काय?’ हा प्रश्न निर्माण झाला. अयोध्येत जन्मल्याचा जन्म दाखला श्रीरामास सादर केल्याशिवाय रामजन्मभूमीचा तिढा सुटणे शक्य नव्हते. 1992 च्या ‘मंदिर वही बनाएंगे’आंदोलनाने हा तिढा संपवला. ना कोर्ट ना कचेरी, ना चर्चा, ना विवाद.

रामजन्म मुक्तीसाठी लाखो करसेवक 1992 साली अयोध्येत जमले. ते सरळ वादग्रस्त घुमटावर चढले. छिन्नी-हातोडय़ांच्या घणांनी ते घुमटच तोडून त्यांनी श्रीरामास मुक्त केले. त्या एका घटनेने देशाचे राजकारणच बदलले. हिंदुत्वाची वावटळ उठली. त्यात भाजपसह शिवसेनेचे राजकारण देशभरात पसरले. त्याआधी लालकृष्ण आडवाणी यांनी ‘रामरथयात्रा’ काढली, देशात आंदोलनाचे वातावरण निर्माण केले. राजकारणाचे वारेच त्यामुळे पूर्णपणे फिरले. देशात हिंदुत्वाचे नवचैतन्य निर्माण झाले व श्रीराम त्या परिवर्तनाचे प्रतीक बनले. लालकृष्ण आडवाणी यांनी रामरथावर स्वार होऊन संसदेतला दोन सदस्यांचा भाजप तेव्हा 85 खासदारांपर्यंत नेला. पुढे त्याच भाजपने आजचा पल्ला गाठला तो आडवाणी व त्यांच्या तेव्हाच्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे. अयोध्या आज चैतन्याने उजळून निघाली असताना भारतीय जनता पक्षाचे ते लढवय्ये भीष्म लालकृष्ण आडवाणी कोठे आहेत? बाबरीचा ढाचा कोसळला तेव्हा अयोध्येत आणि जगभरात एकच हाहाकार उडाला. अयोध्येच्या रणावर उद्रेकाचा सागर खवळला होता व त्या हिंदू सागराचे नियंत्रण करण्याची हिंमत कोणात नव्हती. बाबरी पाडली जाईल असे तेव्हा कुणालाच वाटले नव्हते, पण हिंदुत्वाच्या त्या तुफान लाटेत बाबरी कोसळली. त्याची जबाबदारी घ्यायला भारतीय जनता पक्षाने नकार दिला. अटल बिहारी वाजपेयी, श्री. आडवाणी या नेत्यांनी बाबरी पडल्याबद्दल शोक व्यक्त केला. भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यानी पक्षातर्फे अधिकृत भूमिका जाहीर केली ती धक्कादायक होती, “भारतीय जनता पक्षाचा बाबरी पतनाशी संबंध नाही. आम्हाला दुख झाले आहे, हे काम शिवसैनिकांनी केले असावे.” हे वक्तव्य म्हणजे पळपुटेपणा व जबाबदारी झटकण्याचा प्रकार होता. लोकांत निराशा पसरली. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर तेजस्वी वाणी कडाडली, “होय, मला अभिमान आणि गर्व आहे त्या शिवसैनिकांचा, ज्यांनी अयोध्येत हे अचाट कार्य केले.” अयोध्येतील प्रदीर्घ बंदीवासातून अखेर भगवान श्रीराम मुक्त झाले, पण मुवईसह देशभरात दगली उसळल्या. त्यानंतर बदल म्हणून मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली.

भारतीय जनता पक्ष आजही श्रीरामाचेच खातो, पण रामाचा विचार, रामराज्य मात्र वाऱ्यावर आहे. आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठऽच्यानिमित्ताने पूजाअर्चा, व्रत, अनुष्ठाने करीत आहेत, उपवास करीत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, ते गमतीचे आहे. अयोध्येत यानिमित्ताने नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झाले, ते संपूर्ण राजकीय आहे. श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्य मार्गाशी, संयम आणि शौर्याशी या ‘मोदी-रामायणा’चा संबंध नाही. त्यांचे रामायण त्यांच्यापाशी, अयोध्येतील मंदिरात विराजमान होणाऱ्या भगवान श्रीरामाचरणी आमचे श्रद्धापूर्वक दंडवत! असे सामनातून म्हंटल आहे.