हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेत जे काही वादळ आलं, ज्या घडामोडी घडल्या, आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. यावेळी गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर, नकली अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –
शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी ‘शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. पुराण काळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे गमतीजमती सुरूच असतात; पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे. शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱयांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात.
दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील. शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. 57 वर्षे ती घुमतच आहे. ही डरकाळी घुमू नये यासाठी आजवर का कमी प्रयत्न झाले? गद्दार लांडग्यांना वाघाचे कातडे पांघरून नकली वाघ बनविण्याचे प्रयोग महाराष्ट्रात अनेकदा झाले; पण ते सगळे प्रयोग मराठी माणसानेच बंद पाडले. ना प्रयोग चालले, ना त्याचे लेखक-दिग्दर्शक- नेपथ्यकार यांचे नामोनिशाण राहिले. आताही 40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. जनतेने या प्रयोगाकडे पाठ फिरवली असली तरी ही 40 पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत.
वडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’ च्या मालावर या ‘मिंधे’ गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे. पुन्हा घटनातज्ञांपासून न्यायालयांपर्यंत सर्वांनी या ‘मिंधे’ वाघांना नकली आणि बेकायदा ठरवले आहे. त्यांचे वाघाचे कातडे ओरबाडून काढले आहे. मात्र राजकीय दुकानदारी सुरू ठेवायची तर ‘नक्कल’ करायलाच हवी. साव’ बनून ‘आव’ आणायलाच हवा. मिंधे गटाची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱया वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच! महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते. महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे.
डरकाळी पडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील 57 वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रात गेली 57 वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. असं म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.