लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर….; सामनातून राहुल गांधींचे समर्थन तर मोदींवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन मध्ये देशविरोधी भाषण केलं असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपचे कान उपटले आहेत तर राहुल गांधी यांच्या भाषणाचे समर्थन केलं आहे. देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. त्यामुळे लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर त्यांना वाईट वाटणे साहजिक आहे असं म्हणत सामनातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे –

हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का, हाच प्रश्न निर्माण झाला असताना लोकशाहीचा अपमान वगैरे झाला असा कंठशोष करणे हा निव्वळ फार्स आहे. राहुल गांधी लंडन येथे गेले व हिंदुस्थानी लोकशाहीवर त्यांनी शंका उपस्थित केल्या. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उतूमातू जाताना दिसत आहे.

खरं तर हिंदुस्थानातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम प्रत्यक्ष सत्ताधारी भाजप करीत आहे व त्याच भाजपचे नेतृत्व मोदी करीत आहेत. मुळात राहुल गांधी यांनी लोकशाहीबाबत लंडन येथे केलेली विधाने चूक आहेत काय याचे आत्मचिंतन मोदी पक्षाने करायला हवे. लोकशाहीच काय, देशाचे स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे व देशात धर्मांधता, कट्टरतेची आग लावून राजकीय भाकऱया भाजल्या जात आहेत. ईशान्येकडील राज्यांत भाजपचे पुढारी ‘गोमांस भक्षणा’चे समर्थन करतात, पण देशात इतरत्र गोमांसावरून भाजपसमर्थक मुसलमानांच्या हत्या करतात. कोणी काय खायचे, प्यायचे हे लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला दिलेले स्वातंत्र्य आहे. मोदी राजवटीत हे स्वातंत्र्य उरले आहे काय? खाण्या-पिण्यावरून लोकांना रस्त्यावर जिवंत जाळले जाते हे काही लोकशाही ठिकठाक असल्याचे लक्षण नाही. लग्न, प्रेमप्रकरणे यावरून दंगली घडवायच्या व त्यास हिंदुत्वाचा मुलामा देऊन राजकीय फायदा घ्यायचा हे लोकशाहीला शोभणारे नाही.

सरकारला प्रश्न विचारणाऱ्या राजकीय विरोधकांना खतम करायचे, तुरुंगात डांबायचे हे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? लोकशाहीत भाजप वॉशिंग मशीनचे नक्की कर्तव्य काय यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. मुळात निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही. ‘ईव्हीएम’ पद्धतीत भाजप घोटाळा करत असल्याची शंका लोकांच्या मनात आहे. ईव्हीएममध्ये अदानी व्हायरस घुसवून लोकांची मते फिरवली जातात. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या ही लोकभावना आहे.

शिवसेनेच्या स्वामित्वाचा निकाल देताना निवडणूक आयोगाने घटना तसेच लोकशाहीची सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवली. हा तमाशा जगाने पाहिला. देशाच्या लोकशाहीची जगभरात लाज गेली. तेव्हा राहुल गांधी लंडनमध्ये काय बोलले त्याचे काय एवढे मनावर घेता? हिंदुस्थानातील लोकशाहीच्या किंकाळ्या जगभरात पोहोचल्याच आहेत. मोदी यांचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराविरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. नेत्यानाहू हे त्यांच्याच देशात बिळात लपल्यासारखे आहेत. आपल्या देशातही अशीच खदखद आहे व स्फोट कधीही होईल असे वातावरण आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकशाहीवर शंका घेतली यावर इतके भडकून उठण्याचे कारण काय? देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. त्यामुळे लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर त्यांना वाईट वाटणे साहजिक आहे.

लंडनच्या मंचावर जाऊन राहुल गांधी जे बोलले त्यामुळे ज्यांना अतीव दुःख वगैरे झाले त्यांनी गेल्या सहा-सात वर्षांत परदेशात जाऊन मोदी यांनी काय विधाने केली तेसुद्धा पाहायला हवे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे लोकशाही मार्गानेच सत्तेवर आले होते व देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले. पण या कुटुंबाविषयी परदेशात जाऊन अपशब्द वापरण्यात आले. तेव्हा लोकशाही व देशाची इज्जत धोक्यात आली नव्हती काय? देशात गेल्या 70 वर्षांत काहीच झाले नाही, अशी थापेबाजी करणे हाच देशाचा सगळय़ात मोठा अपमान आहे. हिंदुस्थानात जन्म घेणे हे दुर्भाग्य असल्याचे लोक मानत होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी परदेशात जाऊन केले. तेव्हा देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या आत्म्यास किती वेदना झाल्या असतील? असा सवाल करत सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.