हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या असा मोठा गौप्यस्फोट सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले असं म्हणत सामनातून जयंत पाटील यांचे कौतुकही करण्यात आलं आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची मंगळवारी ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. या काळात जयंतरावांनी एक पुस्तक वाचून संपवले. आयएएल अॅण्ड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात या कथित घोटाळय़ाशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपपुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा.
जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसेही शांत झोपतात. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, “मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपचे कडीकोयंडे लावले. सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकश्यांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले. जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत असं म्हणत सामनातून जयंत पाटील यांचे कौतुक करण्यात आले आहे.