हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अजित पवार यांनीच आपल्या आमदारांसह शिंदेंच्या सरकारमध्ये सहभाग घेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे. अजित पवार निधी देत नव्हते असा आकांडतांडव करणारे आता काय करणार? असा थेट सवाल सामनातून करण्यात आलाय.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रात भूकंप वगैरे झाला काय? तर अजिबात नाही. या भूपंपाची चाहूल आधीच लागली होती. त्यामुळे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे, आजचा दिवस मावळेल. उद्या नवा दिवस उजाडेल हेच खरे. जे शिवसेनेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी ‘डील’ पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल असा दावा साम नातून करण्यात आलाय.
सगळय़ात ‘पोपट’ झाला आहे तो श्रीमान देवेंद्र फडणवीस यांचा. “नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱयांचा पक्ष आहे,” असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. छगन भुजबळ हे तर जामिनावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’च्या अटकेची तलवार आहे. तेसुद्धा हंगामी जामिनावर बाहेर आहेत. तटकरे यांचाही पाय खोलात आहे. सगळय़ांची प्रगतीपुस्तके ही तपास यंत्रणांच्या शेऱयांनी भरलेली आहेत. या सगळय़ांनी श्रीमान फडणवीस यांच्या साक्षीने मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल हेसुद्धा या सोहळ्यास उपस्थित होते. इक्बाल मिर्चाशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली. आता श्री. पटेल यांची संपत्ती मोकळी होईल व ते पेंद्रीय मंत्री होतील. शरद पवार यांना कालपर्यंत जे ‘देव’ मानत होते असे बरेच भक्तगण अजित पवारांसोबत गेले. नरहरी झिरवळ, नीलेश लंके, संजय बनसोडे वगैरे आमदारांची अलीकडची भाषणे याबाबत ऐकण्यासारखी आहेत. यानिमित्ताने एक झाले – भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला.
अजित पवार शेवटपर्यंत सांगत होते, “शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ काय ?” फडणवीस सांगत होते, “राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही.” पण दोघांनीही पलटी मारली. त्या पलटीमागे मिंधे गटाचा घात आहे. शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे. अजित पवार व त्यांचे लोक राजभवनात शपथ घेताना शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडले. अजित पवार आम्हाला देत नव्हते, असे अकांडतांडव करणारे आता काय करणार? अजित पवार फुटीर राष्ट्रवादीसह सरकारात सामील झाले व निधीचे वाटप करणारे अर्थ खातेही त्यांच्याकडेच आले. शिंदे व त्यांच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार. ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे असं ठाकरे गटाने म्हंटल आहे.