हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकारच्या बेफिकिरीमुळेच पुलवामा हल्ला झाला असा सनसनाटी आरोप तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांच्या फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात. जवानांसाठी का होत नाही? असा सवाल सामनातून करण्यात आला. तसेच जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे हे कारस्थान होते काय ? असं म्हणत ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल ?
पुलवामा हल्ला हा नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिला. पुलवामा हल्ल्यात 300 किलो आरडीएक्स वापरले. त्यात 40 जवानांचा बळी गेला. त्याच जवानांच्या बलिदानाचा प्रचार करून भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मते मागितली. त्यावेळीही पुलवामा हल्ल्यामागचे सत्य काय? हल्ला कोणी केला? कोणी घडवून आणला? अशा शंका विरोधी पक्षांनी उपस्थित केल्याच होत्या, पण प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना तेव्हाही देशद्रोही ठरवून मोदी व त्यांचे अंध भक्त मोकळे झाले. 300 किलो ‘आरडीएक्स’ इतकी कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पुलवामापर्यंत पोहोचले कसे? 40 जवानांच्या निर्घृण हत्येस जबाबदार कोण? यामागचे सत्य बाहेर आले नाही, पण जम्मू- कश्मीरचे पुलवामावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्याचा स्फोट केला व तो स्फोट 300 किलो आरडीएक्सपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान मोदी यांचे कश्मीरकडे दुर्लक्ष होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे डोळेझाक केल्यामुळेच पुलवामा हल्ला झाला, असे श्री. मलिक यांनी सांगितले. फेब्रुवारी 2019 मध्ये जगाला हादरवणारा पुलवामा हल्ला झाला. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते.
जम्मू-कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत व सत्य सांगितल्याबद्दल त्यांना ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’कडून लगेच निमंत्रण येऊ शकते. जसे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 40 जवानांची हत्या झाली. त्याचे फक्त राजकारण झाले. दुसऱ्या एखाद्या देशात अशा हत्यांबद्दल त्या देशाचे संरक्षणमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे ‘कोर्ट मार्शल’च केले असते, पण 40 जवानांच्या हत्येचे खापर ठरल्याप्रमाणे पाकिस्तानवर फोडून हे लोक गप्प बसले.
“पुलवामामधील तो रस्ता प्रवासासाठी धोकादायक होता. सहसा त्या रस्त्याने सुरक्षाकर्मी प्रवास करीत नाहीत. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण पण गृह मंत्रालयाने ही मागणी फेटाळली. जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती. त्याच रस्त्यावर आतंकी हल्ला होऊन 40 जवानांचे बलिदान झाले,” पण अत्यंत गंभीर बाब तर पुढेच आहे. “पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांनी कार्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना सुरक्षा त्रुटींची माहिती दिली. मला त्यांनी शांत बसण्यास सांगितले. असं सत्यपाल मलिक यांनी म्हंटल्याचे सामनातून सांगण्यात आले.
श्री. सत्यपाल मलिक यांनी जम्मू-कश्मीरमधील अनेक रहस्यांवरचा मुखवटा दूर केला आहे. कश्मीरातील पंडितांच्या हत्या मोदी-शहा थांबवू शकले नाहीत. पंडित मंडळी आजही विस्थापितच आहेत. 370 कलम हटवल्यापासून कश्मीर खोऱ्यात निवडणुका घेण्याचे धाडस सरकार दाखवू शकले नाही. या काळात भ्रष्टाचार, गैरव्यवहार जोरात सुरू आहे. पुलवामा प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी व भारतीय जवानांच्या अस्मितेशी निगडित होते. 300 किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आले व पुढचा किमान महिनाभर कश्मीर खोऱ्यात फिरत राहिले तरी गुप्तचर व सुरक्षा यंत्रणांना त्यांचा सुगावा लागला नाही. सीमा पार करून आरडीएक्स आत आले हे पहिले व आत आल्यावर अनेक सुरक्षा कडय़ा पार करून ते पुलवामापर्यंत पोहोचले हे दुसरे.
या बेफिकिरीची जबाबदारी नक्की कोणी घ्यायची? जवानांना पोहोचविण्यासाठी सरकारने विमान दिले नाही. म्हणजे जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे हे कारस्थान होते काय ? विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी फोडलेल्या चाळीस-पन्नास आमदारांना या राज्यातून त्या राज्यात हलविण्यासाठी विमाने सहज उपलब्ध होतात, पण जवानांच्या सुरक्षेसाठी विमान मिळत नाही. यालाच सध्या देशभक्ती मानले जाते असं म्हणत सामनातून मोदी सरकार वर हल्लाबोल करण्यात आलाय.