हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ईडी कारवाईत जप्त करण्यात आलेला अवैध पैसा गरिबांना वाटण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सामना अग्रलेखातून मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते, ते 15 लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा असं म्हणत सामना अग्रलेखातून मोदींना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. (Saamana Editorial Slam PM Modi)
सामना अग्रलेखात काय म्हंटल??
तोंडभरून आश्वासन देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा प. बंगालच्या आकाशात सोडला आहे. प. बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरीब जनतेला वाटणार, असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखविले आहे. मोदी बोलतात खूप, भावनांना हात घालत आश्वासनांची पीकपेरणी करण्यात ते तरबेज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या या पेरणीचे पीक आपल्या पदरात का पडू शकलेले नाही, हा प्रश्न आजही जनतेला पडला आहे.
2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले. मोदी यांनी आपले शब्दही गिळले आणि वल्गनादेखील. आता प. बंगालमध्ये ईडीच्या कस्टडीत असलेले तीन हजार कोटी रुपये तेथील गरीबांना वाटण्याचे शब्ददेखील मोदी निवडणुकीनंतर गिळून टाकू शकतात. आधी तुमचे ते 15 लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा.
ईडीच एक घोटाळा आहे. दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले. ‘चॅरिटी बिगिन्स अट होम’ याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा. पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनाचा घोटाळा आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. 15 लाखांच्या भूलभुलय्यात ती फसली, मात्र ‘ईडी’ रकमेची तुमची लोणकढी थाप प. बंगालमधील जनतेला फसवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा! असं म्हणत सामना अग्रलेखातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.