हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहतूक कोंडी आणि धावपळीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बोरिवली ते ठाणे (Thane to Borivali) हा प्रवास आता फक्त 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रवास करण्यासाठी तुमचा वेळ वाचणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) हा सर्वात लांब भूमिगत बोगदा असून या दुहेरी बोगद्याचे (Double Tunnel) बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी या प्रकल्पाचे काम एमएसआरडीसीने करायचे होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते एमएमआरडीएकडे सोपवले.
रिपोर्टनुसार, या प्रस्तावित प्रोजेक्ट मध्ये दोन्ही टोकांना (ठाणे आणि बोरिवली) एकत्रितपणे 11.8 किमीचा डबल बोगदा असेल. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून एमएमआरडीएला वन्यजीव मंजुरी मिळाली आहे. आता प्रकल्प पुढे नेण्यासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे.
हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार आहे. या बोगद्यात सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा मिळतील. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी १ तासाहून जास्त वेळ लागतो. मात्र एकदा हा बोगदा तयार झाला की मग फक्त १५ ते २० मिनिटात तुम्ही ठाण्यावरून बोरिवलीला जाऊ शकता. या प्रकल्पासाठी मुंबईकरांना ४ वर्ष वाट पाहावी लागेल.
या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागाठाणेच्या एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडीच्या पुढे असेल. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन अशा एकूण सहा लेन्स असतील. प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे याचा खर्च 11,235 कोटींवरून 13,200 कोटींपर्यंत वाढला आहे.