हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे – फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता आगामी काळात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची महायुती अस्तित्वात येते का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही भाजपशी युती करायला काहीही हरकत नाही असं म्हणल्यानांतर या चर्चाना अजून बळ मिळालं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात भाजप मनसे आणि शिंदे गट असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो.
राज्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी २०१९ ला महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता मिळवली. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याचा गाडा व्यवस्थितपणे हाकला. कोरोना संकटातही सरकारची कामगिरी उत्तम राहिली. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर हे सरकार कोसळले. आणि राज्यात शिंदे – फडणवीस यांनी एकत्र येत नवं सरकार स्थापन केलं.
शिंदे – भाजप सरकार आल्यांनतर मनसेची देखील त्यांच्याही जवळीक वाढलेली आपण पाहिलं. गणेशोत्सव काळात राज ठाकरेंच्या घरी शिंदे – फडणवीसांनी दिलेली भेट असो वा त्यांनतर खुद्द राज ठाकरेंचं वर्षावर जाणं असो , यातून त्यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांशी जुळलेली नाळ समोर आली. येव्हडच नव्हे तर मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याला ही शिंदे- फडणवीस यांनी हजेरी लावल्यांनंतर राज्याच्या राजकारणातील नवं समीकरण तर तयार होत नाही ना ? अशा शक्यता समोर येऊ लागल्या आहेत.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून हे तिन्ही नेते एकत्र येऊ शकतात. त्यातच मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे, आधीच शिवसेनेतील फुटींनंतर उद्धव ठाकरे मोठ्या राजकीय संकटात आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेची सत्ताही खेचून ठाकरेंना अजून एक धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मुंबईतील एकूण परिस्थिती पाहता मराठी मतांचा टक्का महत्त्वाचा आहे, त्यासाठी भाजपला मनसेची मदत कधीही फायदेशीर ठरू शकते. परंतु मनसेची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका या महायुतीच्या प्रयत्नात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे मनसेसोबत भाजप जाहीर युती करते की छुप्या पद्धतीने हे आता पाहावं लागेल.