हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते 5 युवक कोयना धरणाच्या पात्रात बाजे या ठिकाणी पोहायला गेले होते. यामध्ये अर्जुन हा देखील पोहायला गेला होता. अर्जुन मुंबईहून सुट्टीसाठी गावी आलेला होता. कोयना धरणात सध्या गाळमिश्रीत पाणी असल्यामुळे पोहताना अर्जुन हा खोल गाळात सकून रुतून बसल्याने तो दिसेनासा झाला. अर्जुन दिसेनासा झाल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही.
त्याच्या मित्रांनी याची माहिती अर्जुनच्या कुटूंबियांना व पोलिसांना दिली. त्यानंतर कुटूंबीय व पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत अर्जुनला शोधण्याचे काम सुरु केले. मात्र, अंधार पडल्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबवले. आज पुन्हा अर्जुनाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. अर्जुनाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्यावर गावातील ग्रामस्थांनी, नातेवाईक आणि कुटूंबियांनी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या घटनेची नोंद कोयना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.