मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यात मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला असून या विस्तारात मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देवेंद्र फडणवीस यांनी कॅबेनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्री मंडळात सामावून घेतले आहे. तर योगेश सागर यांना देखील मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री बनवले आहे.
मुंबई मध्ये राज्य विधानसभेच्या जवळपास ४० जागांचा समावेश आहे. त्या जागा जो पक्ष अधिकाधिक जिंकेल त्या पक्षाचा सत्तेचा रस्ता सुखकर बनतो. म्हणून या समीकरणाकडे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी जरा हि दुर्लक्ष केले नाही. प्रकाश मेहतांची उचल बांगडी होताच त्यांच्या जागी आशिष शेलार यांना कॅबेनेट तर योगेश सागर यांना राज्य मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी बहाल केले आहे.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमालीची वाढली आहे. २०१७ साली झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत भाजप ३३ जागावरून ८३ जागांवर जाऊन धडकली होती. हा सर्व करिष्मा आशिष शेलार यांनी करून दाखवला होता. म्हणून त्यांची मंत्री मंडळात वर्णी लावण्यात आली आहे. तर योगेश सागर हे देखील विधान सभेचे आमदार असून स्वयम प्रकाशित नेते आहेत.