दिल्ली | या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे. जिवंत सरकार नाही. निकाल वेळेत लागला आणि कोणीही अडथळे आणले नाहीत. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा हल्लाबोल शिंदे- फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी श्री. राऊत म्हणाले, एक घटनाबाह्य सरकार राज्य करतय, निर्णय घेतयं आणि भ्रष्टाचार करत आहे. या देशात लोकशाही व न्याय व्यवस्था आहे की नाही ही आजच्या खटल्यावरून सिध्द होईल. सत्यमेव जयते तेजाने तळपत असेल तर आम्हाला न्याय मिळेल. एक पक्ष फोडण्यासाठी पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून निवडणूक आयोग, न्यायालयात आम्ही समोर जात आहोत. तारखावर तारखा पडत असून निष्क्रीय सरकार हसत आहे. महाशक्ती पाठीशी असल्याने घटनाबाह्य सरकार चालत राहील असे त्यांना वाटत आहे. महाशक्ती असेल किंवा अन्य काही असले तरी आमचा देशाच्या न्यायशक्तीवर आमचा विश्वास आहे.
राहूल गांधीच्या यात्रेचा विरोधकांनी धसका घेतला
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा भूमिका स्पष्ट आहे. काश्मीर आणि पंजाब या दोन्ही राज्यातून शेवटचा टप्पा पार करणार आहेत. हा राजकीय इव्हेंट नाही. राहूल गांधीच्या कपड्यावरून कसला वाद करत आहात. एका तपस्वी व्यक्तीप्रमाणे प्रवास करत असल्याची लोकांची भावना आहे. कपड्यावरून व खाण्यावरून वाद निर्माण करणारे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. राहूल गांधीची भारत जोडो यात्रा ही विरोधकांनी धसका घ्यावा, अशी असल्याची खा. संजय राऊत म्हणाले.
देशात सर्वात असुरक्षित राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या आड शिवसेना येवू शकते. त्यामुळे भाजपाने पहिल्यांदा शिवसेनेचे तुकडे केले. उद्या आमच्यावर देशद्रोहीचे गुन्हे दाखल होवू शकतात. सरकारच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्र राज्य असुरक्षित आहे. पोलिसांचा वापर भांडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिमा जगात होती. ती मलीन करू नका, असेही खा. संजय राऊत म्हणले.