औरंगाबाद – राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, सरकारने एकीकडे मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह आदी ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली असताना शाळा, महाविद्यालये सरसकट बंद का ? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून तर दुरावली आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या लेखन, वाचन आणि ज्ञानग्रहण क्षमतेवर देखील विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणात खंड पडल्याने अनेक मुले शेतात काम करत असून बालविवाह प्रमाण वाढले आहे. कोविड सेंटरसाठी प्रशासनाकडून वसतिगृह ताब्यात घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वसतिगृह ताब्यात घेण्याच्या विषयाचा देखील शासनाने विचार करावा.
शाळांना वारंवार अशा प्रकारचा ‘ब्रेक’ लागत राहिला तर याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावे; तर शहरातील कोरोनामुक्त हद्दीतील शाळा, महाविद्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.