हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हजारमाची-राजमाची, ता. कराड येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे ओगलेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची, ता. कराड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, हजारमाची गावातील तरूणी आणि राजमाचीतील तरुणाचे प्रेम संबंध होते. काही दिवसापूर्वी त्यांनी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. तेव्हापासून दोघेही अज्ञातवासात आहेत. दरम्यान, मुलाच्या कुटुंबातील व्यक्तीने या दोघांचा प्रेम विवाह लावून दिल्याची माहिती मिळाल्याने संतापलेल्या मुलीच्या कुटुंबातील काही नातेवाईकांनी राजमाची गावात जाऊन मुलाच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तसेच कुटुंबातील जनार्दन गुरव यांना बाहेर घेऊन गेले. काही वेळेनंतर गुरव यांना मारहाण झाल्याची तसेच ते बेशुद्ध पडल्याची माहिती मुलाच्या कुटुंबियांना मिळाली. यावेळी कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत कृष्णा रुग्णालयात आणले. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा डॉक्टरांनी घोषित केले.
ओगलेवाडी परिसरात खळबळ
प्रेमाच्या कारणातून मुलाच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याची तसेच मारहाणीत एकाचा खून झाल्याचे समजताच ओगलेवाडी हजाराची परिसरात रात्री एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस हजाराची तसेच राजमाची गावात दाखल झाले रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही तसेच मारेकऱ्यांचा शोध सुरू होता.
उपसरपंच निवडी दिवशीच मर्डर
हजारमाची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. नवनिर्वाचित उपसरपंचाच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला होता. गुलालात माखलेल्या कपड्यानिशी हजारमाचीतील तरूण रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात होते.