नांदेड – घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यात मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे शेती विकावी लागण्याचा मनात राग धरून पीत्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जामखेड येथे 19 एप्रिल रोजी घडली.
जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकते (40) असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांची जवळपास पाच एकर शेती आहे. दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत सापडले होते. सिंधुताई देवकते (18) ही मुलगी विवाहयोग्य झाली होती. एका ठिकाणी तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. परंतु लग्नाची तारीख काढण्यात आली नव्हती. त्यात लग्नासाठी पैसे कुठून आणावेत म्हणून बालाजी देवकते हे चिंतित होते. त्यातून हे कृत्य केले. आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान बालाजी देवकते ही घरी आले. घरात लग्नाचा विषय निघताच त्याने लग्नासाठी पैसे जमा कसे करू? तुझ्या लग्नासाठी आता काय शेती विकू? असे म्हणून मुलगी सिंधुताईच्या डोक्यात बागेच्या लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची आई अहिल्याबाई मध्यस्थी करीत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंधुताईचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी बालाजी देवकते हा पसार झाला. यावेळी अहिल्याबाई यांनाही दुखापत झाली होती.