हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाज मागास आहे की नाही? हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.
एकीकडे राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांकडे सोपवल्यामुळे ऐन पेपरच्या काळात शाळांमध्ये शिक्षक दिसेनासे झाले आहेत. तसेच खुर्च्या ही रिकाम्या पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला फक्त पहिली पास असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे सर्वेक्षणाचे काम दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिली पास व्यक्तींवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सर्वेक्षणाचा व्हिडिओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर मराठा समाजाचे सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वेक्षण करणारा एक अधिकारी बोलताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे, हा अधिकारीच आपण फक्त पहिली पास आहोत, आपल्याला यातलं काही कळत नाही, हे बोलताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यामुळे सध्या राज्य सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
जर अशा प्रकारे सर्वे होत असेल तर कसे काय आरक्षण भेटणार आपल्याला मराठा बांधवांनो जागे व्हा पहिली पास शिक्षण आहे असे कर्मचारी काय सर्वे करणार…
— बाळासाहेबांचा महेश (@MaheshDixit) January 24, 2024
हे पूर्ण टीम पास आहे सरकारचा pic.twitter.com/M6WXyZ4asV
कर्मचाऱ्यांने व्हिडिओत काय म्हणले?
व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोज कांबळे असे आहे. हा अधिकारी मनपात इलेक्ट्रीक मदतनीस म्हणून काम करत आहे. तसेच, त्याचे शिक्षण इयत्ता पहिलीपर्यंतच झाले आहे. अशा व्यक्तींकडे प्रशासनाने मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्वेक्षणाचे काम दिले आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की तो व्यक्ती स्वतः आपल्याला सर्वेक्षणाचे काम जमत नसल्याचे सांगत आहे. तसेच, “मला काहीच येत नाही. माझे शिक्षण पहिली आहे. मला मोबाईल माहित नाही. हे सर्व साहेबांना सांगितले. त्यानंतर त्यांना सहायक नेमून सर्वेक्षण करा असे सांगण्यात आले” अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र आता हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तर सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.