नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या तसेच खाद्य तेलाच्या आणि गॅसच्या किंमतीमध्ये सुद्धा भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. पण आता खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिली आहे. देशातील खाद्यतेलाच्या किरकोळ बाजारातील किमतीतील वाढीचे प्रमाण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावातील वाढीच्या तुलनेत कमीच आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच दिले. अधिवेशनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गोयल बोलत होते.
यावेळी बोलताना गोयल म्हणाले ‘ कोरोना मुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील तेलबियांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने खाद्यतेल बाहेर देशातून आयात करावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढल्याने खाद्यतेलाच्या देशांतर्गत किंमतीत वाढ झाली आहे. तरीसुद्धा देशातील किमतींचा वाढीचा दर आटोक्यात आहे. असे गोयल म्हणाले.
खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर सरकार लक्ष ठेवून आहे. वाढीचा दर कमी करण्याकडेच सरकारचे प्रयत्न चालू आहेत. पहिल्या टप्प्यात शेतमालाशी निगडित आयात शुल्काची रचना करण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे. यात खाद्यतेलाचा समावेश आहे. रास्त दरात खाद्य तेलाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच शेतकरी आणि ग्राहक यांचे हित बघताना समतोल ठेवण्यात येईल यासाठी आंतर मंत्रालयीन समिती काम करत आहे. अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार खाद्यतेलातील भाववाढ
*शेंगदाणा तेलात किरकोळ बाजारातील किंमतीत 60 रुपयांची वाढ होऊन सध्या 180 रुपये प्रति किलो.
* मोहरी तेलाची किंमत 37 रुपयांनी वाढली असून 147 रुपये प्रति किलो.
* सोयाबीन तेलात 40 रुपयांची वाढ झाली असून सध्या 130 रुपये प्रति किलो.
*सूर्यफुलाच्या तेलाच्या किमतीत 35 रुपयांनी वाढ झाली असून सध्या 140 रुपये प्रति किलो.
* पाम तेलाच्या किमतीत दुप्पट वाढ झाली असून सध्या 160 रुपये प्रति किलो
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page