कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाईनला आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरू लागल्याचे गावातील ग्रामस्थांनी पाहिले. या आगीच्या घटनेमुळे गावात ग्रामस्थांनी चांगलीच धावपळ उडाली.
वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जळून खाक; कोट्यवधीचे नुकसान pic.twitter.com/oB15uyEs8X
— santosh gurav (@santosh29590931) March 4, 2023
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आणण्यात आलेल्या या पाईपला आग लागल्याच्या घटनेची ग्रामस्थांनी तात्काळ कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल आणि कराड नगरपालिका यांना दिली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर तीन अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचे काम केले.
यावेळी जवळपास तीन तासांहून अधिक काळ ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला जात होता. या आगीच्या रौद्र रूपामुळे पाईप डेपोच्या शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेचेही मोठे नुकसान झाले आहे. सदरील आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसून ही आग कोणीतरी लावली असल्याचे सध्या बोलले जात आहे. या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम पोलीसांकडून केले जात आहे.