औरंगाबाद : रविवारी मध्यरात्री वाळूज महानगर येथे चोरट्यांनी साडेदहा लाख रुपये असलेली लोखंडी तिजोरी पळवली. परंतु ती तिजोरी दोन टन वजनाची होती त्यामुळे ती उघडता आली नाही. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी ती तिजोरी तेथेच ठेवून पळ काढला.
फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयात काम करणारे संदेश रामेश्वर घुवारे हे सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कार्यालय उघडण्यास आले असता त्यांना कार्यालयाचे अर्धे शटर उघडे दिसले. त्यांनी कार्यालयाची पाहणी केली असता त्यांना लोखंडी तिजोरी गायब दिसली. त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच संदेश घुवारे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच एमायडीसी वाळूज ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एम आर घुनावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी 100 मिटर अंतरावर तिजोरी फोडण्याचा आवाज आला असता कंपनीचे कर्मचारी आणि पोलिसांचे पथक आवाजाच्या दिशेने गेले. या चोरांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तिजोरी तिथेच सोडून पळ काढला. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिजोरी उघडली असता आतमध्ये ठेवलेले 10 लाख 59 हजार 797 रुपये होते. मात्र कंपनीच्या कार्यालयातील ड्राॅवरमध्ये ठेवलेले 26 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले.
या कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन चोरटे कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. पहाटे दोन वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी कार्यालयातील सीसीटीव्हीची दिशा बदलून शटरचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला.परंतु लॉक तुटत नसल्यामूळे चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने शटर उचकटून आत प्रवेश केला. कार्यालयाची झाडाझडती घेत असताना ड्रॉवर मध्ये ठेवलेले 26 हजार रुपये त्यांनी काढून घेतले.आणि नंतर लोखंडी तिजोरी ढकलत ढकलत जवळपास शंभर मीटर अंतरापर्यंत ओढत नेली. या प्रकरणी कंपनीचे संदेश घेवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.