औरंगाबाद – ‘वाव मोमोज’ची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तिघा भामट्यांनी तब्बल 11 लाख 96 हजार रुपयांना चुना लावला. हा प्रकार डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी तिघा भामट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी औरंगाबादच्या सिंधी कॉलनीतील व्यापारी कैलास तलरेजा (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे बीएचआर इंडियन फूड दुकान आहे. डिसेंबर 2021 मध्ये ते फेसबुक पाहत असताना त्यांना ‘वाव मोमोज’ या खाद्यपदार्थाच्या ब्रॅण्डसंदर्भात माहिती मिळाली होती. तलरेजा यांनी अधिक माहिती मिळवून त्यांनी wowmomofoods.co.in. या संकेतस्थळावर नाव, इमेल आयडी व संपर्क क्रमांक दिला. त्यांना franchise@ wowmomofoods.co.in यावरून इमेल मिळाला. त्यावर बॅंक, आधारकार्ड, पॅनकार्ड शिक्षण व लोकेशन फोटो मागविले आणि पत्रक मिळाले. त्यात ब्रॅंडची माहिती व्यापारविषयक, फ्रॅंचाईजी घेण्याबाबत संपूर्ण माहिती दिली होती. सहा डिसेंबरला तलरेजा यांना एक फोन आला. दरम्यान समोरून फ्रॅंचाईजी घेण्यासाठी आठ लाख रुपये, आवश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. तलरेजा यांनी फ्रॅंचाईजी घेण्याचे ठरविले.
दरम्यान त्यांना अप्रोवल लेटर देत समोरून नोंदणी शुल्क, फ्रॅंचाईजी शुल्क, जीएसटी आदींसाठी रकमेची मागणी करत विविध सात प्रकारच्या खात्यात 11 लाख 96 हजार रुपये रक्कम मागवून घेतली. तसेच 7 जानेवारी 2022 रोजी एक व्यक्ती औरंगाबादेत येऊन शॉप सुरू करून देईल असे इमेल आणि फोनद्वारे कळविण्यात आले. मात्र काही दिवस लोटले तरी कोणीच न आल्याने तलरेजा यांनी वेबसाइट आणि मेल आयडी तपासले असता, आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यावरून त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली असता संशयित आरोपी संजीव कुमार, श्रीवास्तव आणि संदीप कश्यप या आरोपींविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.