औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रशासनाने अंशत: लॉकडाउनसह गर्दी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. उद्योगांना आवश्यक त्या उपाययोजना, तपासणी, चाचणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करत उद्योगांमध्ये उत्पादन सुरू आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला, सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
प्रशासनाने अंशत: लॉकडाउनसह अन्य उपाययोजना केल्या आहेत. औरंगाबाद परिसरात उद्योगांची संख्या ४५०० हून अधिक आहे. चार लाखांच्या आसपास कामगार आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देश लॉकडाउन होता. ४० दिवस उद्योग बंद होते. स्थानिक प्रशासन, उद्योजक, उद्योग संघटना यांच्या पुढाकाराने अँटीजेन टेस्ट करून उद्योग नियम व अटींचे पालन करून सुरू झाले.
दिवाळीच्या आसपास उद्योग बऱ्यापैकी सुरू झाले होते. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने उद्योगांची चिंता वाढली होती. प्रशासनाने कामगार, कर्मचारी यांची अँटीजन चाचणी करून कोरोना नियमांचे पालन करून उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली. सूचनांचे पालन करत उद्योगांनी चाचण्या, सुरक्षित वावर नियम, उद्योग परिसरात मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळे सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उद्योगांची वाटचाल कायम आहे.
सरकार आणि प्रशासनाने सांगितल्यानुसार उद्योगांमध्ये कोरोना चाचणी, मास्क, सुरक्षित वावर नियम काटेकोरपणे पाळले जात आहे. सर्व नियम पाळून उत्पादन सुरू आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा