औरंगाबाद – व्यसनाधिनतेतुन ग्रासलेल्या बापानेच पोटच्या ८ वर्षीय मुलीला दोरीने गळफास देऊन संपविले. मात्र, मुलीनेच फाशी घेतली असा बनाव केला होता. बुधवारी (ता.१०) पत्नीच्या फिर्यादी वरून करमाड (ता.औरंगाबाद) पोलिस ठाण्यात अखेर पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासात करमाड पोलिसांनी छडा लावला. दगडू चंद्रभान पाचे (रा.गोलटगाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेत सोमवारी (ता.८) इयत्ता तिसरीत शिकणारी व अभ्यासात हुशार असलेल्या आठ वर्षाच्या भक्ती उर्फ सारिकाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. यावेळी पित्याने गळफास घेऊन मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, घरात पित्याशिवाय दुसरा कुणीही साक्षीदार नसल्याने पोलिसांनी याबाबत शंका व्यक्त केली होती. याबाबत पोलिसांनी माहिती काढली असता आरोपी दगडूला दारूचे व्यसन जडले. यातून तो पत्नी पुष्पा व मुलींना सतत मारहाण करीत होता. दीड महिन्यापूर्वी पती-पत्नीत वाद झाला. दगडूने पत्नीला मारहाण केल्याने पत्नी सर्व मुला-मुलींना घेऊन माहेरी जाण्याचे ठरवले. मात्र, दगडुने मुलांना घेऊन जाण्यास नकार दिल्याने पुष्पा एकटी तेव्हापासून सोनपिंपळगाव (ता.अंबड जि. जालना) येथे माहेरी गेली होती. काही दिवसांनी आरोपी पत्नीला सासरी नांदण्यासाठी ये म्हणून धमक्या देत होता. नसता एका तरी मुलीचा जीव घेईल, असे तो म्हणायचा. अखेर त्याने सोमवारी भक्तीला दोरीने गळफास दिला व तिनेच गळफास घेतल्याचा बनाव केला. मात्र, करमाड पोलिसांच्या तपासाअंती त्याचे हे पितळ उघडे पडले.
याप्रकरणात बुधवारी (ता.१०) पत्नीच्या फिर्यादी वरून करमाड (ता.औरंगाबाद) पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निमीत गोयल, उपअधीक्षक शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्यासह सहकार्यांनी केली.