हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित या उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यात होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. गेल्या वर्षापासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र आता हा पुल पूर्णपणे तयार करण्यात आला आहे. उद्घाटनानंतर हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.
चांदणी चौकातील उभारण्यात आलेला पुल 8 रॅम्प, 2 अंडरपास, 4 पूल, 2 सेवारस्ते मिळून तयार करण्यात आला आहे. या पुलासाठी एकूण खर्च सुमारे 865 कोटी रुपये इतका झाला आहे. सरकारकडून या पुलाचा प्रकल्प पुढील पन्नास वर्षांचा विचार करून साकारण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी 30 ते 35 हजार वाहने धावणाऱ्या या पुलावरून आता दिवसाला दीड लाख वाहने धावू शकणार आहेत. तसेच यामुळे वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघणार आहे. या पुलाची लांबी लांबी 150 मीटर, रुंदी 32 मीटर इतकी आहे.
पूर्वीच्या चांदणी चौकातील अडचणी
नवीन बांधण्यात आलेल्या या पुलामुळे चांदणी चौकाचे पूर्ण चित्र बदलून गेले आहे. पूर्वीच्या चांदणी चौकातील पुलावरून जाताना परिसरातील रहिवाशांना घरी किंवा बाहेर जाताना रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. तसेच यामुळे एक्सीडेंट सारख्या देखील दुर्घटना घडल्या होत्या. पूर्वीच्या पुलावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होऊन जायचे. याचबरोबर, बावधकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण व्हायची. पूर्वीच्या पुलावर मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन होते. तर, मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन आणि, साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन होते.
आताच्या चांदणी चौकातील सुविधा
आता बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीचा मार्ग कायमचा सुटणार आहे. नवीन पुलामुळे मुळशी रस्त्यावरून सातारा-कोथरूडकडे जाण्यासाठी रॅम्प-1, तसेच मुळशी रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी रॅम्प-2, मुळशी रस्त्यावरून बावधन-पाषाणकडे जाण्यासाठी रॅम्प-3 याचबरोबर, कोथरूड-सातारा रस्त्यावरून मुळशीकडे जाण्यासाठी रॅम्प-4, एनडीए-बावधन रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी रॅम्प-5 , पाषाण,बावधन रस्त्यावरून सातारा-कात्रजकडे जाण्यासाठी रॅम्प-6 , सातारा, कोथरूड रस्त्यावरून पाषाण-बावधनकडे जाण्यासाठी रॅम्प-7 आणि सातारा, कोल्हापूर रस्त्यावरून मुळशी-पाषाण-बावधनकडे जाण्यासाठी रॅम्प-8 ची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यांवर 33 छोटे गार्डन्स उभारण्यात आले आहेत. तसेच वाहतूक सुरक्षितेसाठी 33 वार्डनची नेमणूक करण्यात आली आहे.