जालना – शहरातील अंबड मार्गावरील यशवंत नगर येथील निवासस्थान आवरून मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाकडे जात असताना, एटीएम मधून पैसे काढून रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबादेत हलवण्यात आले आहे.
मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा भार संभाजी रामभाऊ वारंगुळे पाटील (56) यांच्याकडे होता. ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून महाविद्यालयात जात होते. न्यायालयासमोर दुचाकी उभी करून ते एटीएम मध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. एटीएम मधून 20 हजार रुपये काढून ते परत दुचाकी कडे येत असताना जालन्याकडून जिंतूर कडे जाणाऱ्या विकी जैन या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे प्राचार्य रस्त्यावर कोसळले. तेथे उपस्थित नागरिकांनी लगेचच त्यांना उचलून प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु नंतर त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होत असल्याने त्यांना मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या लिव्हरला जोरदार धडक बसल्याने शरीरात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांच्या हृदयावर ताण आल्याने त्यांचे हृदयही निकामी झाल्याचे सांगण्यात आले.
राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून ते तेव्हाच्या मत्स्योदरी महाविद्यालयातील रुजू झाले होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडवळी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असून, एका मुलीचा विवाह झाला आहे. पाटील यांच्या अपघाती निधनामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.