हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता याच प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज सीआयडीने बीड न्यायालयात दिलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण उघड केले आहे. यामध्ये त्यांनी देशमुख यांची हत्या अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
सीआयडीने (CID) दिलेल्या माहितीनूसार, “कंपनीकडून खंडणी वसूली करण्यामध्ये संतोष देशमुख हे मोठा अडथळा ठरत होते. आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र कंपनीने त्यांना खंडणी देण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्याचा कट रचला होता.”
यापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले होत जात होते. काहींच्या मते, सुदर्शन घुले याला झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून देशमुख यांची हत्या करण्यात आली असावी, असे सांगितले जात होते. परंतु सीआयडीने या दाव्याला फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, खंडणी वसुलीत अडथळा ठरण्याचे मुख्य कारण देशमुख यांची हत्या होण्यामागे आहे.
सीआयडीच्या रिपोर्टनुसार, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या आरोपींनी वारंवार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. मात्र, कंपनीने खंडणी देण्यास नकार दिला होता. यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनीच्या बाजूने भूमिका घेतली आणि सुदर्शन घुले यांना थेट आव्हान दिले. यामुळे आरोपींमध्ये असंतोष निर्माण झाला. शेवटी या आरोपींनी खंडणीच्या मध्ये येणाऱ्या देशमुख यांनाच हटवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासातून या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. अशातच आज समोर आलेल्या दाव्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सीआयडीच्या पुढील तपासाला वेग मिळणार आहे.